Monday 3 December, 2012

देवबाग अन्‌ हेरंब न्याहरी निवास

 

कामांच्या व्यापातून थोडासा मोकळा श्वास घ्यावा या उद्देशाने कोकण पर्यटनाचा बेत आखला होता.
सौरभ, संकेत आणि डॉ. सुरेश सावंतांसह सायंकाळी ६ वाजता देवबागला पोहोचलो.
राहण्यासाठी हॉटेल आधीच बुक करून ठेवले होते.
हेरंब न्याहरी निवासचे मालक सुनिल केळुसकर यांनी आमची अगदी उत्स्फूर्त स्वागत केले.
जणू माहेरवाशीण बहीण घरी आलीये असे वाटले.
हेरंब न्याहरी निवासचे नुकतेच ओपनिंग झाले होते.
वैभव खोबरेकर नावाचा चुणचुणीत गोड हसतमुख मुलगा देवबागविषयी खडान्‌खडा माहिती देत होता.

हेरंब न्याहरी निवासात शिफ्ट होताच अंगणातूनच भव्यदिव्य सागराचे दर्शन झाले अन्‌ मन भावविभोर झाले.
अस्ताचलगामी सूर्य सागरात लुप्त होतांना पाहाणे म्हणजे असंख्य लाटांसारख्या भावनांचे नुसते उचंबळणेच !
सूर्य निरोप घेत होता.
उद्या सकाळी लवकर येण्याचे आश्वासन देत तो लुप्त झाला अन्‌ चंद्रकोरीने आपल्या स्वच्छ पांढर्‍याशुभ्र प्रकाशाने सागराला उजळून टाकले.

हेरंब न्याहरी निवासच्या अंगणातून समुद्र पाहाण्याचा अनुभव काही औरच होता.
लाटांची गाज ऎकत नारळीच्या झाडाखाली रात्रीचे मालवणी जेवण अप्रतिमच होते.

देवबाग एक अस्पर्शित असा स्वच्छ समुद्र किनारा लाभलेले बेट. (हो, बेटच म्हणायले हवे खरे तर. कारण एक यायचा मार्ग सोडला तर देवबाग तिनही बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे.)
महाराष्ट्रातील मॉरिशस म्हणजे देवबाग-तारकर्ली असे का म्हणतात याची प्रचिती तिथला शांत, शीतल, निर्मळ समुद्रकिनारा पाहून येते.
बोटीने कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम पाहातांना ‘अद्वैत’ शब्दाचा खरा अर्थ कळतो तो इथेच.
दुर्दैवाने आम्हाला डॉल्फिन माशांनी दर्शन दिले नाही. (इथे डॉल्फिन नेहमी पाहायला मिळतात असे ऎकले होते. युट्युबवर व्हिडिओसुद्धा पाहिले होते.)
मात्र २००४ च्या त्सुनामी लाटांनी तयार झालेले त्सुनामी आयलंड पाहून मनात जापानच्या त्सुनामीची भयंकर आठवण येऊन निसर्गाच्या रौद्ररूपाला मन आपोआप शरण जाते.
अंगावर शहारा येतो, तरीही त्सुनामी आयलंडवर भरतीचे पाणी चढत असतांना चहाचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच.

देवबागच्या समुद्रकिनार्‍यावर सूर्योदयाचे दृष्य अप्रतिम दिसते.
या किनार्‍यावर तारामासा, शंख-शिंपले, खेकडे तर प्रचंड संख्येने पाहायला मिळतात.
पर्यटकांची छोटी मुले पांढर्‍याशुभ्र, मऊशार रेतीत घर बांधत होती तर काहींनी क्रिकेटचा खेळ मांडला होता.

देवबागची कोकणी खाद्यसंस्कृती खूपच भावली.
शाकाहारींसाठी मालवणी जेवण, सोलकढी तर मांसाहारींसाठी पापलेट, सुरमई, सरंगा अशा ताज्या माशांची मेजवाणी मिळते.

निसर्गाने देवबाग-तारकर्लीवर सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केलेली पाहून या भागातील लोकांचा हेवा वाटतो. तिथून पाऊल निघत नाही.

आज देवबाग-तारकर्ली खूप शांत समुद्रकिनारे आहेत, कारण अजून तिथे म्हणावे तेव्हढे व्यावसायिकरण झालेले नाही.
येत्या काही वर्षांत आजचे देवबाग-तारकर्ली पूर्णपणे व्यावसायिक होईल अशी भीती वाटते.

ज्यांना अंगणात बसून समुद्रदर्शन करायचे असेल त्यांनी किमान २-४ दिवसांचा वेळ काढून हेरंब न्याहरी निवासात राहून कोकणी खेड्याचा अनुभव घ्यावा आणि धन्यता अनुभवावी.
पुन्हा देवबाग-तारकर्लीला जाण्याची आस मनात ठेवून देवबाग सोडले.

 

      पापलेट थाळी 

1353255585674

 

   हेरंब न्याहरी निवास

IMAG0797

 

चंद्राने सागराला उजळून टाकले

P1330567

 

    शिंपल्याचे सौंदर्य

P1330666

 

       हेच तर महाराष्ट्राचे मॉरिशस

P1330758

 

सूर्यास्ताचे हे दृष्य पाऊल कसे निघू देईल ?

P1330956

Sunday 22 April, 2012

सूर्य

सूर्य आग ओकतोय .
भाजून काढतोय तनामनाला .
लेकरं , पाखरं तहानलेली .
हरेक जिवाची काहिली होतेय .
हवीय प्रत्येकाला वृक्षांची सावली .
पोळलेल्या मनावर फुंकर घालणारी माऊली .
सूर्याचे रूप उग्र ! त्याला पर्वा नाही कुणाचीही .
एसीत बसुन सुस्तावलेले दुष्काळावर चर्चा करतात .
दूर रस्त्याच्या कडेला बाभळीच्या झाडाला झोका टांगून तान्हुल्याला झोपवून मायमाऊली दगड फोडतेय .
तिच्या डोळ्यात एक स्वप्न आपल्या बाळाला सूर्य बनविण्याचे .
क्रांतिसूर्य जाब विचारणार आहे .
एक दिवस उगवणार आहे .
विषमतेविरुद्ध लढाई जिंकणार आहे ऊन्हात रडणारा तान्हुला .
तो सूर्य मला पाहायचा आहे .

Tuesday 17 January, 2012

डोळे बर्फ होतात तेव्हा...

सभोवती घडणा-या घटना पाहून संवेदनशील मन व्यथीत होते.
जीव घुसमटू लागतो.
सतत अन्याय सहन करणारे मन पेटून उठते.
परंतु प्रतिकुल परिस्थितीमुळे त्याचे बंड अयशस्वी होते.
मग अशी व्यक्ती निराश होते.
अन्याय करणारा अधिकच मुजोर बनत जातो.
शोषित व्यक्ती आणि त्याच्यासोबत काम करणारे त्याचे सहकारी मूक साक्षीदार बनतात.
रोज गुलामीत जगण्याचा अनुभव घेणा-या व्यक्तींच्या डोळ्यांतील आग पार विझून जाते अन् त्याचे डोळे बर्फ होतात तेव्हा ... क्रांतीची आठवण होते.